AI Courses Seats | एआय संबंधित अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये चार वर्षांत १६५ टक्क्यांनी वाढ 
मुंबई

AI Courses Seats | एआय संबंधित अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये चार वर्षांत १६५ टक्क्यांनी वाढ

अभियांत्रिकीतील पारंपरिक शाखांना ‘एआय’चे आव्हान; तंत्रशिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचे महत्त्व वाढले

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग आणि डेटा सायन्ससारख्या उदयोन्मुख शाखांनी राज्यातील तंत्रशिक्षणाचे चित्र बदलण्यास सुरुवात केली असून गेल्या चार वर्षांत एआय-संबंधित अभ्यासक्रमांच्या जागा तब्बल ७,४२६ वरून १९,६६५ पर्यंत वाढल्या आहेत. म्हणजेच चार वर्षांत १६५ टक्के वाढ झाली आहे. वाढती औद्योगिक मागणी आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयांपासून आयआयटी आणि आयटीआयमधील आता शिक्षणही एआयकडे सरकत असल्याचे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिसत आहे.

राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणात गेल्या चार वर्षांत मोठा बदल झाला आहे. पारंपरिक संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसोबत आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग', 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स', 'जनरेटिव्ह एआय', 'रोबोटिक्स' आणि 'डेटा ॲनालिटिक्स' यांसारखे अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. अधिकाधिक महाविद्यालये एआय आणि मशिन लर्निंगशी संबंधित अभ्यासक्रम देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या चार वर्षांत या अभ्यासक्रमांच्या जागा आणि प्रवेशसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही ही वाढ आणखी होण्याची शक्यताही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वर्तवली आहे.

कोरोनानंतर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यात एआय-संबंधित अभ्यासक्रमांच्या केवळ ७ हजार ४२६ जागा उपलब्ध होत्या. गतवर्षी २०२५-२६ मध्ये या जागांची संख्या तब्बल १९ हजार ६६५ वर पोहोचली आहे. प्रवेशसंख्येतही अशीच झेप पाहायला मिळत आहे. २०२२-२३ मध्ये ६ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ही संख्या १६ हजार ९४३ वर पोहोचली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा कल आता पारंपरिक शाखांऐवजी एआय, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्स यांसारख्या उदयोन्मुख शाखांकडे वळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अनेक महाविद्यालयांनी एआय-संबंधित अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त प्रवेशक्षमता मंजूर करून घेतली असून या शाखांच्या जागांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

मुंबई-पुण्यात जागांमध्ये वाढ

अनेक संस्थांनी एआय संशोधन केंद्रे, डेटा सायन्स लॅब, इनोव्हेशन सेंटर आणि उद्योगांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि पुणे विभागात एआय आणि डेटा सायन्सच्या जागांमध्ये विशेष वाढ झाली आहे. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच डेटा सायन्स अभ्यासक्रमासाठी ३ हजार ९६५ जागा उपलब्ध असून त्यापैकी ३ हजार ८०४ जागा गेल्यावर्षी भरल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT