पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज (दि.८) त्यांच्या तीन नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली.
शिंदे यांच्या शिवसेनेने X पोस्टवरून या कारवाईची माहिती दिली आहे. शिवसेना पक्षाने म्हटले आहे की, शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
आज (दि.८) जालनाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, पालघर शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रकाश निकम आणि पक्षाचे कन्नड (छत्रपती संभाजीनगर) तालुक्याचे प्रमुख केतन काजे या तिघांनाही शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.