मुंबई: घरगुती वादातून १९ वर्षीय तरुणाने पत्नीची स्वयंपाकघरातील चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. आग्रिपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कालापानी चौकीजवळ शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मोहम्मद एहसान शेख (१९) आणि त्याची पत्नी जन्नत एहसान शेख (१९) हे दोघेही रोजंदारीवर काम करत होते. प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदने जन्नतच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर एहसानने त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आग्रिपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हल्ल्यात वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे. तसेच पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कालापानी चौकी परिसरात खळबळ उडाली आहे. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुण दाम्पत्याचा घरगुती वादातून झालेला दुर्दैवी अंत परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.