Manikrao Kokate  Manikrao Kokate
मुंबई

Manikrao Kokate : कृषिमंत्री सभागृहात तब्बल २२ मिनिटे पत्ते खेळले! विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद सभागृहात वादग्रस्त मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. आता कृषिमंत्र्यांविरोधात विधिमंडळचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे.

मोहन कारंडे

मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा खुलासा विधिमंडळ चौकशीतून झाला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि. ३०) दिली आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि त्यानंतर बंद सभागृहात त्यांनी वादग्रस्त मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. आज आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करून कृषिमंत्री कोकाटे २२ मिनीटे सभागृहात रमी खेळत असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचे म्हटले आहे. "कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का?" असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

यापुढे तोंड सांभाळून बोला, ही तुम्हाला अखेरची संधी !

राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक वाद बाढवून घेत असल्याने सरकारच्या चांगल्या कामावर पाणी फिरवले जात असून विरोधकांना टीका करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे यापुढे तोंड सांभाळून बोला, कारवाई करण्यास भाग पाडू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वादग्रस्त व तोंडाळ मंत्र्यांची कानउघाडणी केली.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळ सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातच त्यांनी खुद्द सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य केले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची जमीन खरेदी प्रकरणे, त्यांचा नोटांच्या बॅगसह व्हायरल झालेला व्हिडीओ आणि त्यांना आयकर विभागाने बजावलेली नोटीस यामुळे वाद उभा ठाकला. गृहराज्य मंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या आईच्या नावाने परवाना असलेल्या डान्सबारवर पडलेल्या धाडीमुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पुढे आली. या सर्व वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT