Agriculture Admission 2026 Pudhari
मुंबई

Agriculture Admission 2026: कृषी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर; १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी

यापैकी ३ हजार १४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, या विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ऑटो फ्रीज’ झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कृषीच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची (कॅप) पहिली फेरी जाहीर झाली असून, १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. यापैकी ३ हजार १४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, या विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ऑटो फ्रीज’ झाले आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, बी.टेक. अन्न तंत्रज्ञान, बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान आणि बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखांमध्ये चार वर्षांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यातील २०१ कृषी महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १७ हजार ९७६ जागा असून या जागांवर कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यभरातून २३ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले. त्यामुळे पहिल्या कॅप फेरीत या विद्यार्थ्यांचाच विचार करण्यात आला. त्यापैकी १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध पसंतीक्रमानुसार महाविद्यालयांचे वाटप झाले आहे.

राहूरी कृषी विद्यापीठाला सर्वांधिक जागा

पहिल्या फेरीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयांना सर्वाधिक ४ हजार ७०० जागांचे वाटप झाले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयांना २ हजार ९६८, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयांना २ हजार ४६९, तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयांना ७३४ जागांचे वाटप झाले आहे.

दुसऱ्य फेरीच्या जागा २० ऑगस्टला समजणार

पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १७ ते १९ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. महाविद्यालयाकडून कागदपत्रांची निश्चिती झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगइनमधून ‘फ्रीज’ किंवा ‘फ्लोट’ पर्याय निवडायचा आहे.

यासाठी प्रवेश स्वीकृती शुल्क म्हणून १ हजार रुपये भरावे लागणार आहेत. दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा २० ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT