Mumbai Pune Housing Projects
मुंबई : गेल्या काही वर्षांत परवडणार्या घरांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झालेली नाही. मात्र 2030 सालापर्यंत परवडणार्या घरांसाठी तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून मुंबई आणि पुण्यात 35 लाख परवडणार्या घरांची निर्मिती होईल.
कोविडपूर्व काळात 2016 ते 2019 या काळात मुंबई आणि पुण्यात 46 हजार 528 घरांची विक्री झाली होती. कोविडपश्चात ही विक्री दुप्पट झाली. 2019 ते 2025 या काळात या दोन्ही शहरांमध्ये 1 लाख 5 हजार 332 घरांची विक्री झाली. 2019 ते 2025 या काळात आलिशान घरांच्या विक्रीचे प्रमाण 43 टक्क्यांवरून 59 टक्क्यांपर्यंत पोहोचले. मात्र दुसर्या बाजूला विक्री झालेल्या घरांतील परवडणार्या घरांचा वाटा 15 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत पोहोचला. नरेडकोने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला घर घेणे शक्य झाले नसले तरी 2030 सालापर्यंत परवडणार्या घरांसाठी तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 35 लाख परवडणारी घरे मुंबई-पुण्यात बांधली जातील.
पनवेल-उलवे-करंजाडे, ठाणे विकास क्षेत्र, वसई-विरार विकास केंद्र, तसेच कल्याण-डोंबिवली या परिसरात सध्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागात पोहोचणे सहज शक्य होणार आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण महामुंबई क्षेत्रात परवडणार्या घरांच्या निर्मितीला वेग येणार आहे.