मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गेल्या दोन दिवसांत मुंबईत येणार्या दुधाच्या टँकरची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासणीमध्ये मोठ्या कंपन्यांच्या दुधामध्ये मिठाचे प्रमाण असलेले सोडियम क्लोराईड, साखर आणि सोडियम पदार्थांची भेसळ असल्याचे आढळले आहे. या दुधाची पुन्हा तपासणी होणार असून, त्यात प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा मंत्री झिरवळ यांनी दिला आहे.
दुधात होत असलेल्या भेसळीच्या तक्रारी वाढत असल्याने झिरवळ यांनी बुधवारी आणि गुरुवारी पहाटे मुंबईच्या चार चेक नाक्यांवर अचानक जाऊन मुंबईत येणार्या दुधाच्या टँकरची तपासणी केली. यानंतर गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. झिरवाळ यांनी हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेत 98 टँकरमधील 1 लाख 83 हजार 397 लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी केली. यामध्ये अनेक बड्या डेअरींच्या दुधात भेसळ असल्याचे आढळले आहे. मानखुर्द येथील तपासणीत कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक टँकर परत पाठवण्यात आला. तपासणी करण्यात आलेल्या टँकरमध्ये गुजरातसह शेजारील राज्यांतून येणार्या टँकरचाही समावेश होता, असेही त्यांनी सांगितले.
तपासणीमध्ये जप्त केलेल्या सुटे व पिशवीबंद दुधाचे 1062 सॅम्पल तपासले असता 133 सॅम्पलमध्ये दूध मानकाप्रमाणे नसल्याचे आढळून आले. 112 नमुन्यांमध्ये सोडियम क्लोराईड, 14 नुमन्यांमध्ये सोडियम, सुक्रोज म्हणजेच केन साखर (1), कमी मिल्क फॅट (1) असे भेसळयुक्त नमुने आढळले आहेत. आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन दुधाची तपासणी केली जाणार असून त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढळली असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले.
परराज्यांतील डेअरींमध्ये तपासणी करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार आहे. अन्नभेसळीवर कारवाई करण्याचे राज्याच्या औषध व प्रशासन विभागाला मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे बड्या डेअरींमध्ये जाऊन दुधाची तपासणी करणे आणि भेसळ आढळल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी विभागाला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. कायद्यानुसार ज्या डेअरी अथवा कंपन्यांची उलाढाल 20 कोटी रुपयांच्या आत आहे, अशाच कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार राज्याला आहे, असेही झिरवळ यांनी स्पष्ट केले.