मुंबई

Aditya Thackeray Tweet: 'कार्याध्यक्ष'पदाच्या चर्चांना उधाण... राऊतही म्हणाले, तरूणांना संधी; आता आदित्य ठाकरेंचे वेगळेच ट्विट

Anirudha Sankpal

Aditya Thackeray Shiv Sena Exicutive President Post: ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना गुरुवारी उधाण आले होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या सर्व बातम्यांचे अधिकृतपणे खंडन केले आहे. "पक्षामध्ये अशा कोणत्याही पदाबाबत किंवा बदलाबाबत सध्या चर्चा सुरू नाही," असे स्पष्टीकरण देत त्यांनी या चर्चेवर पडदा टाकला आहे.

नेमकी चर्चा काय होती?

सकाळपासून विविध माध्यमांमध्ये अशा बातम्या येत होत्या की, १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे हे मोठी घोषणा करतील. यामध्ये आदित्य ठाकरे यांना पक्षाचे 'कार्याध्यक्ष' पद दिले जाईल आणि त्यानंतर ते आपली नवी तरुण टीम उभी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. खासदार संजय राऊत यांनीही "तरुणांना संधी दिली पाहिजे" असे म्हणत या बदलाचे संकेत दिले होते. यामुळे राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे आता फ्रंट फूटवर येणार, अशा चर्चांना वेग आला होता.

आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

मात्र, या बातम्या सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर वेगाने पसरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्वतः यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, "सकाळपासून मी अनेक चॅनेलवर माझ्या कार्याध्यक्ष पदाबाबतच्या बातम्या पाहत आहे. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. पक्षात अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही." आदित्य ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केल्याने कार्यकर्त्यांमधील संभ्रम आता दूर झाला आहे.

२००३ च्या पुनरावृत्तीच्या चर्चा थांबल्या

२००३ साली ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती, तसाच काहीसा बदल आता आदित्य ठाकरेंच्या बाबतीत होईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटत होते. परंतु, स्वतः आदित्य ठाकरेंनी नकार दिल्याने सध्यातरी संघटनेत असा कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT