मुंबई : १९९२ मध्ये घडलेल्या बहुचर्चित जे. जे. शूटआऊट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने दोघा आरोपींविरुद्ध अतिरिक्त पुराव्यांची नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सूरी उर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रामपती सिंग उर्फ श्रीकांत राय या दोघांविरुद्ध पुरावे नोंदवण्यात आले आहेत. अनेक दशकांच्या विलंबानंतर गोळीबाराचा खटला पुराव्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जे. जे. शूटआऊट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
९२च्या सुमारास मुंबईत अंडरवर्ल्ड कारवायांना ऊत आला होता. त्या काळातील धाडसी कारवायांमध्ये जे.जे. रुग्णालयातील गोळीबाराच्या घटनेचा समावेश होता. गुंड शैलेश हळदणकर आणि दोन कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. १२ सप्टेंबर १९९२ रोजी पहाटेच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात विशेष न्यायालयाने नोंदवलेले कबुलीजबाब तसेच इतर कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रमाचे वर्णन केले आहे. आरोपी दीर्घकाळ फरार राहिले होते. परिणामी, इतर आरोपींवरील खटल्यापासून त्यांचा खटला स्वतंत्र करण्यात आला होता.
गोळीबाराचा संपूर्ण घटनाक्रम
अरुण गवळी टोळीचा कथित शार्पशूटर असलेला हळदणकर उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाला होता. दाऊद इब्राहिमने त्याचा मेहुणा इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या गुंडांना हळदणकरवर गोळीबार करण्यास सांगितले होते. दाऊद टोळीच्या गुंडांनी पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेण्यासाठी आधी रुग्णालयाची रेकी केली. नंतर पहाटेच्या सुमारास एके-४७ रायफल, पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर सोबत घेऊन दोन डझन शूटर रुग्णालयात पोहोचले. हल्लेखोरांनी हळदणकर उपचार घेत असलेल्या वॉर्डमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट असल्याचे भासवल्याचा आरोप आहे.