मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच जागांमध्ये बदल नसला तरी दंत (बीडीएस) पदवी अभ्यासक्रमासाठी मोठा बदल झाला आहे. राज्य शासनाने जळगावमध्ये नव्या दंत महाविद्यालयाचा आरंभ केल्यामुळे या अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 50 जागांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भातील पहिली अंतिम गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गतवर्षी बीडीएस (दंत पदवी) अभ्यासक्रमासाठी एकूण 2 हजार 726 जागा उपलब्ध होत्या. यापैकी 2 हजार 315 जागा राज्य कोट्यात, 51 जागा अखिल भारतीय कोट्यात आणि 360 जागा संस्थात्मक कोट्यात राखीव आहेत. अखिल भारतीय कोट्यातून देशभरातील कुठल्याही राज्यातील पात्र विद्यार्थी इतर राज्यातील शासकीय / अनुदानित महाविद्यालयांतील ठरावीक टक्केवारीच्या जागांसाठी प्रवेश घेऊ शकतात शासकीय/निगम/अनुदानित क्षेत्रात 4 महाविद्यालयांमध्ये एकूण 326 जागा असून त्यात 275 राज्य कोट्याच्या व 51 जागांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रात 25 महाविद्यालयांमधील 2 हजार 400 जागा उपलब्ध असून त्यापैकी 2040 जागा राज्य कोट्यात आणि 360 जागा संस्थात्मक कोट्यात आहेत.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली अंतिम गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जवळपास 64 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 11 ऑगस्टपर्यत कालावधीत महाविद्यालयांचा पसंती क्रम भरता येणार आहे.