वाशी : शहरातील उद्यान, रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी श्वानांची विष्ठा पडल्यास संबंधित श्वानांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच श्वान पाळण्यासाठीचा परवाना घेणेही बंधनकारक आहे. याविषयी पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने शहरभर जनजागृती चालू केली आहे.
या जनजागृती अंतर्गत शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तसेच महापालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करून उद्यान आणि मोकळ्या जागा याठिकाणी पेट कॉर्नर बांधले आहेत. या ठिकाणी सदर श्वानाला मलमूत्र विधीसाठी नेणे अपेक्षित आहे. परंतु अनेकदा श्वानमालक बेजबाबदारपणे वर्तन करताना आढळून येतात.
श्वानाला फेरफटका मारण्यास बाहेर आणून पेट कॉर्नरवर नेण्याऐवजी उद्यानात रेंगाळत बसतात. त्यामुळे श्वानाद्वारे रस्ते, उद्यान व अन्य सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन केले जाते. श्वानाने केलेले मलमूत्र साफ करणे ही मालकाची जबाबदारी आहे; परंतु ते याकडे दुर्लक्ष करतात. याचा नाहक त्रास अन्य नागरिकांना होत आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.याची नोंद घेत महापालिकेने जनजागृती चालू केली आहे.
महापालिकेने जनजागृतीपर लावलेल्या या फलकावर लिहिले आहे की, श्वान मालक म्हणून राहो तुमचा थाट, पण श्वानाच्या मलाची स्वत:च लावावी विल्हेवाट अशा आशयाचे फलक प्रशासनाने जॉगिंग ट्रॅक, उद्याने, मैदाने, पदपथ व रहदारीच्या ठिकाणी लावले आहेत. श्वान पाळणे ही गोष्ट नाही साधी, श्वान मल साफ करायला शिकावे आधी, असे आवाहनही या फलकावर करण्यात आले आहे.
श्वानाचे मलमूत्र साफ करणे ही मालकाची जबाबदारी
नवी मुंबई महानगरपालिका श्वानांवरील करनियमन उपविधी 1993 अन्वये सर्व पाळीव श्वानांसाठी परवाने असणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाईन परवाना उपलब्ध करून घेण्याची सोयही आहे. श्वानाने केलेले मलमूत्र साफ करणे ही श्वानमालकाची जबाबदारी आहे. पदपथ, रस्ते, उद्याने, मैदानात श्वानमल साफ न केल्यास पहिल्या वेळेस 100 रुपये आणि पुढील प्रत्येक वेळेस 250 रुपये दंड आकारण्याचा चेतावणीही महानगरपालिकेने दिली आहे. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही यामध्ये स्पष्ट केले आहे.