मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Pudhari
मुंबई

Mumbai AC Local : एसी लोकल ट्रेनची पहिली खेप पुढच्या वर्षी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

तीन वर्षांत सर्व लोकल एसी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मेट्रोच्या धर्तीवर मुंबई उपनगरीय रेल्वेही आधुनिक आणि वातानुकूलित होणार आहे. त्यासाठी जिथे वंदे भारत ट्रेनची निर्मिती होते त्या तिन्ही कोच फॅक्टरीत मुंबईसाठीच्या २३८ नव्या एसी लोकल ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या वर्षी त्यातील पहिली खेप दाखल होणार असून, २०२९-३० पर्यंत सर्व २३८ आधुनिक, स्वच्छ आणि वातानुकूलित लोकल रेल्वेगाड्या मुंबईला मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

वरळी डोम येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, मुंबईची लोकल सेवा मेट्रोच्या धर्तीवर आधुनिक आणि एसी करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र, ज्या गतीने काम सुरू होते, त्या गतीने २०३० पर्यंत अपेक्षित बदल करणे शक्य झाले नसते. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेऊन या कामाला वेग देण्याची विनंती केली.

त्यानंतर केंद्र सरकारने देशातील तीन आधुनिक रेल्वे कोच कारखान्यांमध्ये या लोकलच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी उत्पादन करण्याऐवजी तीन कारखान्यांमध्ये काम विभागले जाणार असून, लोकलच्या निर्मितीला वेग मिळणार आहे. या लोकलची पहिली मालिका २०२७ मध्ये मुंबईत येईल. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत मुंबईतील लोकल सेवा मेट्रोसारखी वातानुकूलित करण्याचे उद्दिष्ट आहे. या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुविधा असतील.

सामान्य प्रवाशांवर बोजा नाही

दरम्यान, एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा पडणार नाही, एसी झाल्यानंतर सेकंड क्लासचे तिकीट वाढवण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकर अनेकदा म्हणायचे की, मेट्रोच्या सेवा आधुनिक झाल्या; मात्र लोकलचे काय? जुन्या ट्रेन कधी बदलणार? आता ही खंत दूर होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT