Abhishek Ghosalkar : मॉरिसने घरी बोलावून केला घात, कोण होते अभिषेक घोसाळकर? Abhishek Ghosalkar
मुंबई

Abhishek Ghosalkar : मॉरिसने घरी बोलावून केला घात, कोण होते अभिषेक घोसाळकर?

मॉरिसने घरी बोलावून केला घात, कोण होते अभिषेक घोसाळकर?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उल्हासनगरात गेल्याच आठवड्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सहा गोळ्या शरीरात घुसल्याने महेश सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने भयचकित झालेल्या आता महाराष्ट्राचा दहिसरमधील घोसाळकर हत्येने अक्षरशः थरकाप उडवला. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची गुरुवारी संध्याकाळी 'फेसबुक लाईव्ह' सुरु असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा हा एकेकाळचा शत्रू अचानक मित्र बनला आणि आपल्या घरी कार्यक्रमाला निमंत्रित करून त्यानेच अभिषेक यांचा घात केला. हा घातपात घडवल्यानंतर मॉरिसनेही स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत जीवन संपवले. (Abhishek Ghosalkar Firing Case)

फेसबुक लाईव्हवर करत हत्या

मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर एकेकाळचे कट्टर शत्रू. पण ते गुरुवारी अचानक एकत्र आलेले दिसले. मॉरिसभाईच्या घराबाहेर अन्नधान्य-साडीवाटपाचा कार्यक्रम होता. त्यासाठी मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना निमंत्रण दिले. मॉरिसच्या घरात शेजारी बसून आधी दोघांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या भागातील लोकांशी संवाद साधला आणि याच संवादाच्या शेवटी मॉरिसने अभिषेक यांना गोळ्या घातल्याचे लाईव्ह दिसले. मुंबईच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात फेसबुक लाईव्हवर प्रथमच झालेल्या या राजकीय हत्येने महाराष्ट्राच्या अंगावर सरसरून काटा आला.

फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस भाई हा अभिषेक यांच्या बाजूच्याच सोफ्यावर बसला होता. आपल्याला एकत्र पाहन अनेक लोकांना आश्चर्य वाटेल असे मॉरिस म्हणतो. आयसी कॉलनीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साड्या वाटायच्या, राशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचे ठरवल्याचेही मॉरिसभाई सांगतो. अभिषेक भाई फार बीझी असतात. त्यांच्याकडे फार वेळ नाही, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही तो मॉरीस नंतर अभिषेक घोसाळकरांनी संवाद साधला. आताच आपण सांगितले की आपण एकत्र येणार आहोत चांगला दृष्टीकोन ठेवून आणि एकत्र राहून चांगलं काम करायचं आहे… (मध्येच मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणांसाठी पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं केलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणत असतानाच मॉरीस भाई परत येतो… आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत.

आधी मॉरीस भाई उठतो. काही सेकंदानंतर अभिषेक घोसाळकर बाहेर कार्यक्रमाला जाण्यासाठी उठतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. ते मोबाइलकडे पाहत असतानाच अत्यंत जवळून पाच गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात येतात. प्रचंड धक्का बसलेले अभिषेक घोसाळकर स्वतः लाच सावरण्याचा प्रयत्न करतात पोटावर गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर टाकून ते पळण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी दोन गोळ्या त्यांना लागतात. पुढचे दृष्य कॅमेरेंच्या फ्रेममध्ये नाही. मात्र नंतर आणखी दोन गोळ्या घातल्याचे आवाज येतात.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर

अभिषेक घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर या नगरसेवक होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे ते उमेद्वार होते. त्यांनी एमएचबी कॉलनी, आयसी कॉलनी हा मतदार संघ बांधून ठेवला होता. त्यांचा या विभागात चांगला संपर्क होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT