मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तो दिवस 3 ऑक्टोबर आता ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये राज्यस्तरीय उपक्रम, बृहन्महाराष्ट्रस्तरीय उपक्रम आणि जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे 2500 वर्षाची परपंरा गृहीत धरण्यात आली आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरिता प्रतिवर्षी 3 ऑक्टोबर दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मराठी भाषा विभागाने शासन अध्यादेशाद्वारे जारी केले आहे.
यामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन करणे, ताम्रपट आणि शिलालेखांसह अभिजात मराठी ग्रंथांचे प्रदर्शन भरविणे, प्राचीन ग्रंथसंपदेचे समकालीन मराठीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री करणे. अभिजात मराठी ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करून त्यांची शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांना ओळख करून देणे.
शाळा, महाविद्यालये, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजूषा, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे आदी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
3 ऑक्टोबर : अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात भाषा संदर्भातील घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे होईल. त्याचबरोबर अभिजात मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
4 ऑक्टोबर : ‘ऑनलाईन मराठी: दशा आणि दिशा’ या विषयावर मुंबई येथे परिसंवाद. यामध्ये या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ उद्योजक व अभ्यासकांचा समावेश असणार आहे.
5 ऑक्टोबर : ‘अभिजात मराठी भाषेबाबत महाराष्ट्र शासनाच्या भविष्यातील योजना’ या विषयावर मुंबई येथे परिसंवाद घेण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री सचिव, मराठी भाषा समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष यांचा सहभाग आहे.
6 ते 8 ऑक्टोबर : अमरावती येथे 11 भारतीय अभिजात भाषांच्या तज्ज्ञ मंडळींचे संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाचे आयोजन कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती यांच्याकडून करण्यात येणार आहे.
9 व 10 ऑक्टोबर : प्रत्येक तालुक्यातील 2 अशा सुमारे 750 मराठी भाषा अधिकार्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांच्या संमेलनाचे आयोजन जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून करण्यात येणार आहे.