आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारकऱ्यांतर्फे सत्‍कार करण्यात आला  pudhari Photo
मुंबई

Aashadhi Vari | ‘आषाढी वारी‘ सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.

पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी असावी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अम्ब्युलन्ससोबत कार्डियाक अम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, वाखरी वारकरी तळ मॉडेल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या.

विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे

राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा याठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

वाखरी मॉडेल वारकरी तळ करणार

सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे जाते. यामुळे याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा असलेला ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

यावर्षीही राहणार समूह विमा

पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

निर्मल वारी, हरित वारीसाठी काम वाढवून आराखडा करा

वारी कालावधीमध्ये निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरीत वारीने निसर्गाशी साधर्म्य राखण्यास मदत होत असल्याने याकडे गांर्भीयाने पहावे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

36 वॉटर प्रुफ मंडप

राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटर प्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटर प्रुफ मंडप वाढविण्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला. हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळी स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. फिरते शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेवू, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी वारकरी, पालख्यासाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. यावेळी विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, साधू यांनी समस्या, सूचना मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT