मुंबई : ऑनलाईन सेवा पुरविण्यात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर असून, जन्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि कर्नाटक आदी राज्ये ऑनलाईन सेवा देण्यात आघाडीवर आहेत. या राज्यांचा अभ्यास करून महाराष्ट्राचे ‘आपले सरकार’ पोर्टल अद्ययावत केले जाणार आहे. यासोबतच ‘आपले सरकार’साठी नवीन अॅप तयार करून या सेवा मोबाईल अॅपवरही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मंत्रालयात माहिती-तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलसंदर्भात सोमवारी प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. शेलार म्हणाले, ‘आपले सरकार’ ही वेबसाईट अद्ययावत करून नव्या स्वरूपात तयार करण्याची गरज आहे. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध करून देताना अर्ज करण्याची पद्धत सुलभ असायला हवी. तसेच अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉटसारख्या सुविधांसह ‘एआय’चा वापर वेबसाईटवर करण्यात यावा. ‘आपले सरकार’च्या माध्यमातून नागरिकांना 485 सेवा दिल्या जातात.