Aaditya Thackeray On Disha Salian Case
मुंबई : अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो, बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अशा आशयाची पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूला सहा वर्षे उलटल्यानंतर सीबीआयने अखेर FIR दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपास सुरू केला आहे. दिशाच्या वडिलांनी आरोपींमध्ये ज्या नावांचा उल्लेख केलाय त्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला. यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार जोडले जात आहे. यावरुन त्यांनी आज एक्स वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. CBIने या प्रकरणात दाखल केलेल्या या FIRमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत.
माझं नाव जोडण्याचा प्रयत्न
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
बोंबाबोंब करुन खोट्या चर्चांनी सत्य बदलू शकत नाही
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटी माहीती प्रसारित करणे ही दुर्दैवी बाब आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. असे ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. असे आव्हान त्यांनी या पोस्टद्वारे दिले आहे.
माझा लढा सुरुच राहील
पुढे आदित्य ठाकरे यांनी माझा असत्याचा लढा सुरुच राहिल असे म्हटले आहे. ते म्हणाले की ‘परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील’
असे म्हणून त्यांनी आपली पोस्ट संपवली आहे. दरम्यान या अभिनेता सूरज पंचोलीने सोशल मीडियावर एक सविस्तर निवेदन देत त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. दिशा सालियान किंवा शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची आपण कधीही भेट घेतलेली नाही, असा स्पष्ट दावा सूरजने केला होता.
८ जून रोजी इमारतीवरुन पडून दिशाचा मृत्यू
8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. Mid Day च्या 11 जून 2020 च्या वृत्तानुसार, दिशा तिचा प्रियकर रोहन रॉयच्या घरी पार्टीसाठी गेली होती. दिशा ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती. या घटनेनंतर ६ दिवसांनी १४ जून रोजी सुशातसिंग रजपूत यानेही आत्महत्या केली होती. दिशा ही सुशांतची मॅनेजर असल्याने या दोघांचा मृत्यूचा संबंध जोडला गेला.