अदित्य ठाकरे 
मुंबई

आमचं सरकार आल्यावर तरुण- तरुणींना नोकरी हाच एकमेव अजेंडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातल्या सरकारने भ्रष्टचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. पण आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टचाराच्या फाईल्स मी काढणार आहे, असा इशारा देत आमचं सरकार आल्यावर तरुण- तरुणींना नोकरी हाच एकमेव अजेंडा असेल, अशी ग्वाही ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (दि.१२) दिली. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवतीर्थावरील मैदानात हाती तलवार देऊन मला लढण्याचे बळ दिले. मैदानात उतरून महाराष्ट्र आणि जनतेसाठी लढण्यासाठी आशीर्वाद दिले. पण राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांकडून मुंबई, महाराष्ट्राची सुरू असलेली लूट आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक जिंकायची असेल तर हाती मशाल घ्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

लोकसभेचा आपला प्रचार सुरू केला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की, आपल्या राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. गेली दोन वर्ष ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ती वेळ आली आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक कधी लागणार याची वाट बघत होतो. हे सरकार शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहेत . महामंडळावरील नियुक्त्या करत आहेत. आचारसंहिता लवकर लागणार नाही. जोपर्यंत अदानीची सगळी कामे आणि सगळे जीआर निघत नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाहीत. असे मला एका अधिकाऱ्याने सांगितले, म्हणून ही लढाई फार महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रासाठी ८० हजार कोटीची गुंतवणूक आणून दाखवली होती. पण आताच्या मुख्यमंत्र्यांनी २४ तासात ४० कोटी आपल्या दौऱ्यावर उधळले. गुंतवणूक आली नाहीच, असेही ते यावेळी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT