मुंबई : राजकारण, लोकशाही म्हटलं की, हार आणि जीत येणारच. नाही तर सत्ताबदल कसा होणार? निवडणुका ईव्हीएम मशिन किंवा बॅलट पेपरवर घेतल्या, तरी लोक आम्हाला स्वीकारतील, नाकारतील हा लोकशाहीचा भाग आहे; पण यांच्या निवडणुकांमध्येच गडबड आहे. निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याची गरज आहे, असे मत आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुढारी न्यूजच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त ‘विचार मंथन विकासाचे-स्वप्न महाराष्ट्राचे’ हे सूत्र घेऊन आयोजित केलेल्या महासमिट -25 मध्ये पुढारी न्यूज वाहिनीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
या संवादाची सुरुवातच निवडणुका आणि मतचोरी या सध्या चर्चेत असलेल्या विषयावर झाली. मतपत्रिकेवर मतदान होऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव झाला. जिंकलात की तक्रार नसते आणि पराभव झाला की मतचोरीचा आरोप हे कसे? या थेट प्रश्नावर आदित्य यांनी गेल्या लोकसभेचे उदाहरण दिले.
आदित्य म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 47 मतांनी आमची एक जागा त्यांनी खेचून घेतली. पहिले आम्ही 1 मताने जिंकलो हे जाहीर झाले होते. नंतर त्यांनी पोस्टल मते काढली. खरे तर पोस्टल मतदान आधी मोजले जाते; पण लोकसभेची निवडणूक असल्यामुळे त्यावर काही झाले नाही. त्यानंतर सिनेटच्या, शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. सिनेट निवडणुकीत पालघर ते सिंधुदुर्ग असा भाग येतो. ही निवडणूक बॅलट पेपरवर झाली. या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले यश मिळाले.
70 लाख मतदार आले कोठून?
लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत साडेचार महिन्यांचं अंतर होतं. यादरम्यान महाराष्ट्रात 47 लाख मतदार वाढले. महाराष्ट्रात वाढलेले हे मतदार 18 वर्षांपूर्वी जून ते ऑक्टोबरदरम्यान जन्माला आले का? हे वाढलेले मतदार 118 मतदार संघांत आहेत. त्यातील 99 जागी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा विजय झालेला आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासांत हे वाढीव मतदान झालेले आहे. या 70 लाख मतदारांनी एवढ्या वेळात मतदान कसे केले, याची काही पोचपावती आपल्याकडे आहे का?
डिजिटल माध्यम असल्याने आणि मतदानात काही गैरप्रकार होऊ नये, वेगाने मतमोजणी करता यावी, यासाठी इव्हीएम मशिनचा वापर केला जातो, असे निवडणूक आयोग सांगते. मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो तेथे रात्री एक आकडा, सकाळी एक आकडा आला. बारा टक्क्यांनी मतदान रिवाईज कसे होऊ शकते? बरं त्याचं सीसीटीव्ही फुटेजही मागितलं. तेही द्यायला निवडणूक आयोग तयार नाही, अशी खंत आदित्य यांनी व्यक्त केली.
मी निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा मुद्दा गांभीर्याने घेतला नव्हता; परंतु हरियाणाच्या सरपंचांच्या निवडणुकीत दीड हजार मते रिवाईज झाली आणि 1500 मतांनी सरपंच निवडून आले. ईव्हीएमने झालेल्या मतदानात हे घडत असेल, तेही सर्वोच्च न्यायालयासमोर तर आपला देश कुठल्या मार्गावर चालला आहे, याकडे लक्ष द्यायला हवे, असे आदित्य म्हणाले.
हा मतांचा विषय आहे
महाराष्ट्राची ही अवस्था, तर बिहारमध्ये आता 60-65 लाख मतदार कमी केले. कुठे मतदार कमी करून, तर कुठे मतदान जास्त दाखवून हे चालू आहे. एका बारमध्ये 60 लोक राहतात, अशी मतदार यादी आहे. हा अभ्यास त्यांनी घरोघरी जाऊन केलेला आहे. आता आम्ही या विषयावर अभ्यास सुरू केलेला आहे. ते आम्ही लवकरच बाहेर आणू. हा प्रश्न केवळ भाजपचा नाही, तर देशाच्या लोकशाहीचा आहे. आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो आणि उत्तर भाजप देत आहे. कारण, त्यांना ते झोंबत आहे. एका मतदाराने मतदान केल्यानंतर पाच बोगस मतदार मतदान करत असतील, तर त्या मतदारांच्या मतदानाला काडीची किंमत राहत नाही. त्यामुळे हा तुमच्या मतांचाही विषय आहे, याकडे आदित्य यांनी लक्ष वेधले.
भाजपची भूमिका बदलली
आम्ही हिंदुत्व सोडले असा आरोप भारतीय जनता पक्ष करतो. त्यांच्या आणि आमच्या हिंदुत्वात खूप मोठे अंतर आहे. आम्ही काँग्रेससोबत जाऊनसुद्धा ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ असेच आम्ही म्हणत होतो. मॉब लिचिंगवर आम्ही अनेकदा बोललो आहोत. आज खरा हिंदुत्ववादी भाजप सत्तेत असता, तर पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याला विरोध केला असता. भाजप पाकशी खेळण्यास विरोध करत नाही, त्याचा अर्थ बीसीसीआयचा भाजपवर दबाव आहे का? की काही लालूच आहे? जोपर्यंत पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी क्रिकेट न खेळण्याची आमची भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ते तिसर्यांदा म्हटल्यावर पाहू
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वेळेला ‘तुम्ही सुद्धा येथे (सत्ता पक्षात) असू शकता’ असे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते. त्याबद्दल छेडले असता आदित्य म्हणाले, मी पुन्हा येईन असे ते तीन वेळा म्हणाले होते. हे मात्र ते दोनवेळाच म्हणाले आहेत. ते तिसर्यांदा जेव्हा म्हणतील तेव्हा पाहू, असे मिश्कील उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.
मुंबईतील कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, धारावी येथील सोळा-सतरा एकर जमीन अदानींच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे. ज्यांनी मुंबई विकायला काढली आहे, ज्यांनी आपली ध्येय-धोरणे सोडली त्यांच्याशी आमचे मनोमिलन कसे होणार, असा सवालही ठाकरे यांनी केला.
दोघे भाऊ बोलत असतात
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल मी आता काहीच ठामपणे सांगू शकत नाही. दोघांचा संयुक्त मेळावा झाल्याने कार्यकर्ते-पदाधिकार्यांत आनंदाची भावना आहे. दोघे भाऊ अधूनमधून बोलत असतात. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलने केली आहेत.
महाराष्ट्रात सध्या सिटिंग कॉमेडी
आदित्य ठाकरे यांच्या मुलाखतीपूर्वी स्टॅन्डअप कॉमेडियन्सचा परिसंवाद रंगला. अभिनेता सारंग साठे यांची भेट आदित्य ठाकरेंनी घेतली. त्या संवादातील धागा पकडून आदित्य म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सिटिंग कॉमेडी सुरू आहे.
आमचेच महापौर दिसतील - आगामी पालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक शहरात आमच्या सोबत कोणताही पक्ष असला, तरी आमचेच महापौर दिसतील, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. या दोन्ही भावांबद्दल जनमानसात सकारात्मक भावना आहेत. गेल्या दहा-वीस वर्षांत कोण कोणासोबत होतं, यात अडकून राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे, देशाचे आणि समाजाचे हित त्यापेक्षा मोठे आहे. त्यानुसार भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.आदित्य ठाकरे