मुंबई ः मुलुंड येथे शनिवारी मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात ऑटो रिक्षा आणि कारचा चेंदामेंदा झाला. -
मुंबई

Mumbai metro slab collapse | मुंबईत मेट्रोच्या स्लॅबचा तुकडा रोडवर कोसळला; दुर्घटनेत एक ठार, तीन जखमी

रिक्षासह कारचा चुराडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रो पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा अचानकपणे कोसळून एकजण ठार व तीन जखमी झाले. ऐन वर्दळीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे खळबळ माजली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करतानाच मृताच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी रस्त्याने जाणार्‍या ऑटो रिक्षा आणि एका कारवर पडला. त्यात ऑटो व कारमधून प्रवास करणारे 3-4 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असतानाही बॅरिकेटस् लावण्यात आले नव्हते किंवा इतर उपाययोजनाही करण्यात आली नव्हती. याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस, उबाठाची टीका

मुंबईकरांचा जीव स्वस्त झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षेचे नियम केवळ कागदांवरच आहेत काय, असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याची मागणी केली आहे. त्यांनी या अपघाताबद्दल सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना फडणवीस यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT