A mistake by Deepak's CJP: Mumbai Police registered cases against 500 protesters
पुढारी वृत्तसेवा : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शुक्रवारी गांधी जयंती दिवशी शिवाजी पार्क येथे जेलभरो आंदोलन केले. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारूनही 'सीजेपी' ने हे आंदोलन केले. त्यामुळे विनापरवानगी आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंदोलकांमध्ये सीजेपीचे अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका,सौरभ दास यांचा समावेश होता. तसेच आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी, योगेश इंगळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारनंतर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते विद्यार्थी आणि समर्थक जमले. 'ग्यानू मस्ट गो' आणि 'सेव्ह डेमोक्रसी' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात 'एसआयआर' निवडणूक प्रकियेतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलनाची व्याप्ती वाढवत नेण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला.
मुंबईनंतर गोवा, बंगळूर, कोलकाता आदी शहरांत आंदोलन करून अखेरीस दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली. गांधी जयंतीच्या दिवशी नागरिकांच्या अधिकारासाठी आंदोलन करणे ही गांधीजींना श्रद्धाजली असल्याचे त्यांनी म्हटले.
२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ दरम्यान शिवाजी पार्क मैदानात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही विनापरवाना जमाव जमवून सभा व घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर सभा घेऊन मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), (३), १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल.