आधी बोटांचा तुकडा आणि आता ऑर्डर केलेल्या कॉफीमध्ये सापडलं झुरळ  file photo
मुंबई

आधी बोटांचा तुकडा आणि आता ऑर्डर केलेल्या कॉफीमध्ये सापडलं झुरळ

ऑर्डर केलेल्या कॉफीमध्ये सापडलं झुरळ; तिघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबईः मालाड येथील एका हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या कॉफीत झुरळ सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र हॉटेल प्रशासनाने कॉफीमध्ये झुरळ असणे शक्य नसल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक असलेल्या तरुणाने मालाड पोलिसांत तक्रार केली असून हॉटेलच्या मॅनेजर, वेटर व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मालाड येथील न्यू लिंक रोड, सॉलिटर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या होप अॅण्ड शाईन लाऊंज हॉटेलमध्ये घडली. अंधेरी येथे राहणारा तक्रारदार तरुण व्यावसायिक असून त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शुक्रवारी तो मित्रासोबत या हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर केली. ही कॉफी कडवट लागत असल्याने त्याने त्यात स्वीट टाकण्यास वेटरला सांगितले.

कॉफी पिताना त्यांना त्यात एक झुरळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने वेटरसह मॅनेजरला हा प्रकार सांगून जाब विचारला. यावेळी त्यांनी कॉफीमधील झुरळाचे फोटो काढले. यावेळी मालकांनी हॉटेलमध्ये अशीच घटना घडणे शक्य नाही असे सांगून त्याला किचनमधील कॉफी बनविण्याची सर्व प्रक्रिया दाखवली. याच दरम्यान त्यांनी झुरळ बेसीनमधून टाकून पाण्याचा नळ सुरु केल्याने ते झुरळ पाण्यातून वाहून गेले.

पूर्वी बोटाचा तुकडा, आता झुरळ

या घटनेनंतर या तरुणाने घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगून संबंधित हॉटेलच्या मॅनेजरसह वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची घटना ताजी असताना आता कॉफीमध्ये झुरळ सापडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT