A 23-year-old girl was molested by sending obscene messages
अश्‍लील मॅसेज पाठवून 23 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग File Photo
मुंबई

अश्‍लील मॅसेज पाठवून 23 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अश्‍लील मॅसेज पाठवून एका २३ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीकडून तिला जानेवारी महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाईलवरुन अश्‍लील मॅसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करण्यात येत होती. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

तक्रारदार तरुणी ही वांद्रे येथे राहत असून एका खाजगी रियल इस्टेट कंपनीत चार वर्षांपासून काम करते. जानेवारी महिन्यांत तिचा वाढदिवस असतो. त्यामुळे तिला वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे अनेक मॅसेज आणि कॉल आले होते. त्यात तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तिच्याशी मैत्री करायची आहे असे सांगून शारीरिक सुखाची मागणी केली होती. त्यानंतर तिने तो कॉल बंद करुन ब्लॉक केला होता. त्यानंतर तिला वेगवेगळ्या 19 हून अधिक मोबाईल क्रमांकावरुन संबंधित व्यक्तीकडून मॅसेज आणि कॉल येत होते. तो सतत तिला अश्‍लील मॅसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी करत होता. त्याच्याकडून होणार्‍या मानसिक शोषणाला कंटाळून तिने अखेर वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आायटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधित मोबाईल क्रमांकावरुन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT