कोपरखैरणे : परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक केल्यानंतर प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग अॅपद्वारे नागरिकांना फसवणार्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. 12 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून आरोपींनी विविध बँकांच्या 886 खात्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींच्या अटकेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल 393 तक्रारीचा छडा लागला असून 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. इसाण उस्मानी मिनहाज शेख, हितेश पुनाराम देवांगन, सुनील श्रवण देवांगन, तोमेशकुमार मोहीत उईके, राहुल राजू देवांगण, अंकित रमेश सिंग, अभिषेक संजय सिंग, हरिषकुमार मदनलाल, अर्पित संतेन्द्रकुमार सोनवाणी, रजत दिलीप शर्मा, लालबाबू राजेश्वर राम कुमार, कृष्णाअंशू अमित विश्वास अशी अटक आरोपींची नावे आहेत.
बेकायदा गेमिंग अॅप चालविणार्या आरोपींना बँक खाती पुरवणारा आरोपी इम्रान शेखला सीबीडी रेल्वे स्टेशन येथून 14 ऑक्टोबरला अटक केली. त्याने शासन मान्यता असणार्या ऑनलाईन गेमिंगकरीता बँक खाते उघडून दिल्यास काही रक्कम देण्याचे आमिष दाखवत नवी मुंबईतील काही नागरिकांची बँक खाती उघडली होती. त्याचे किट स्वत: कडे घेत रूनावल गार्डन बिल्डिंग नं. 4, रूम नं. 1301, डोंबिवली, जि. ठाणे येथे ते पाठवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या ठिकाणी पथकाने धाड टाकली असता तेथे प्रतिबंधित गेमिंग व सायबर फसवणूक करणार्या पाच जणांना साहित्यासह अटक केले. तपासात इतर आरोपी पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी 16 ऑक्टोबरला धाड टाकत सहा आरोपींना अटक व साहित्य जप्त केले. पुढील अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे करीत आहेत.
* आरोपींनी विविध बँकांच्या 886 खात्यांचा वापर केला असून दाखल 393 तक्रारींमध्ये शेअर मार्केटिंग फॉर्ड, जॉब रॅकेटिंग, वर्क फॉर्म होम, इत्यादी हेडचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एनसीसीआरपी पोर्टलवरील दाखल तक्रारींमधील नागरिकांची एकूण 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक केली आहे.