मुंबई : भविष्यात विज्ञान प्रगती करेल आणि मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकेल, या अफाट आशेपोटी एका सुशिक्षित कुटुंबाने केलेले धक्कादायक कृत्य मुंबईतील मालाड परिसरात उघडकीस आले आहे. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह तब्बल चार वर्षे एका बंद क्लिनिकमधील फ्रीझरमध्ये लपवून ठेवल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.
कुटुंबीयांनी इंटरनेटवर केलेल्या शोधातून अमेरिकेतील ‘क्रायोनिक्स’ या प्रायोगिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवली होती. या तंत्रज्ञानामध्ये मृतदेह अतिथंड तापमानावर (-१९६ अंश सेल्सिअस द्रव नायट्रोजन) जतन केले जातात, जेणेकरून भविष्यात अत्याधुनिक वैद्यकीय विज्ञान आल्यावर मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, असा त्यांचा समज होता. यासाठी मृतदेह अमेरिकेत हलवण्याची त्यांची तयारी सुरू होती. या अघोरी आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असलेल्या प्रकारामुळे पोलिस आणि स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मृतदेह इतकी वर्षे बेकायदेशीरपणे फ्रीझरमध्ये ठेवल्याप्रकरणी पोलिस आता कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत पुढील तपास करत आहेत.
२०२२ मधील मृत्यू अन्
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि कागदपत्रांनुसार, संबंधित वृद्धाचा मृत्यू २०२२ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे झाला होता. मात्र, वडिलांच्या निधनाने सुन्न झालेल्या त्यांच्या मुलांनी व पत्नीने अंत्यसंस्कार न करता मृतदेह जतन करण्याचा निर्णय घेतला.