मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत भटक्या श्वानांची संख्या उदंड झाली असून ती सुमारे दीड ते पावणेदोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या श्वानांच्या उपद्रवामुळे मुंबईकर त्रस्त असून वर्षभरात सरासरी 70 हजारांपेक्षा जास्त वाटसरूंचा श्वान चावा घेतात. परंतु सुप्रीम कोर्टाने आता सार्वजनिक ठिकाणी भटके श्वान दिसल्यास थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच जबाबदार धरले जाईल, असा निर्णय दिल्यामुळे काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो.
मुंबईत भटक्या श्वानांचा उपद्रव गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मासळी व अन्य मार्केट, गृह संकुले, रस्ते, पदपथ, शाळा व अन्य सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यातील काही श्वान हिंसक असतात. त्यामुळे केवळ रात्रीच्या वेळीच नाही, तर दिवसाही मोटारसायकल, पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांवर थेट हल्ला करतात. विशेषत: लहान मुले दिसली की श्वान धावून येतो. त्यामुळे श्वानांची जेथे झुंड असते, तेथून जाण्याची कोणी हिंमत करत नाही. जायचे झाले तर जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. अनेक ठिकाणी श्वान हल्ले करतात, चावाही घेतात, पण त्याची अनेकदा पालिकेकडे नोंदच केली जात नाही. तरीही वर्षभरात किमान 70 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा श्वान चावा घेत असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत 26 जानेवारी 1994 पासून भटक्या श्वानांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई शहर व उपनगरात 26 जानेवारी 1994 पासून निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 2017 पासून बंद पडलेला निर्बीजीकरणाचा कार्यक्रम पुन्हा हाती घेण्यात आला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तीमध्ये काही प्रमाणात घट झाली. 8 वर्षांत 1 लाख 25 हजारापेक्षा जास्त कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. परंतु भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुंबईकरांची आजही सुटका झालेली नाही. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व त्यांना दिली जाणारी रेबिजची लस याची माहिती घेण्यासाठी कुत्र्यांमध्ये मायक्रो चिप बसवण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. या पद्धतीचा महापालिकेचा अवलंब करण्यात येणार होता. मात्र ही योजना कागदावरच राहिली. सध्या निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची ओळख पटवण्यासाठी ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते, त्या कुत्र्यांच्या कानाचे टोक व्ही आकारात कापण्यात येते.
कोर्टाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, क्रीडा संकुल, बस स्थानक , रेल्वे स्थानक अशा ठिकाणच्या सर्व भटक्या श्वानांना निवारा शेडमध्ये ठेवण्यासाठी पुरेसी निवारा व्यवस्था उपलब्ध करावी लागेल, असे मत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
मुंबईत सुमारे 90 हजारांहून अधिक भटके कुत्रे असून, त्यांच्यासाठी केवळ आठच अधिकृत निवारा केंद्रे असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. ठाण्यात वागळे इस्टेट येथे महापालिकेचे कुत्र्यांसाठीचे निवारागृह आहे. मात्र तिथे केवळ 80 कुत्र्यांनाच ठेवण्याची व्यवस्था आहे. मुंबईत 90 हजारांपैकी किमान 30 हजार भटके कुत्रे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतात.