मुंबई : ड्रग्जमुक्त मुंबईसाठी अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई सुरूच आहे. मुंबईची कुख्यात अमली पदार्थ तस्कर रोमा शेख उर्फ पगली हिला अलीकडेच कोल्हापूरला स्थानबद्ध केल्यानंतर आता इर्शाद सरदार खान ऊर्फ चर्शी बाबा या 70 वर्षीय सराईत आरोपीला स्थानबद्ध केले आहे. त्याची रवाणगी छत्रपती संभाजीनगर कारागृहात केली आहे.
या चर्शी बाबावर ड्रग्ज तस्करीचे सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी त्याला ड्रग्जच्या एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर ड्रग्ज तस्करीच्या सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. 2008 साली त्याच्यावर ड्रग्ज तस्करीची कारवाई झाली होती. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करी करू लागला होता. याच दरम्यान त्याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले होते. याच गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आली होती. या सातही गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्थानबद्धेची शिफारस केली होती. पोलीस आयुक्ताकडून आदेश प्राप्त होताच त्याच्यावर स्थानबद्धेची कारवाई करण्यात आली आहे.
अलीकडेच मुंबईतील कुख्यात अंमली पदार्थ तस्कर रोमा आरिफ शेख उर्फ पगली (37) हिला अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेने शासनच्या मंजुरी नंतर एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. तिची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे.
आरोपी माझगाव येथील रे रोड, नारीयलवाडी, सी लिंक ब्रिजजवळील बाबा का ढाबा परिसरात राहत असून चरस, गांजा, कोडेन फॉस्पेट आदी ड्रग्जची तस्करी करतो. त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्याला चर्शी बाबा या टोपन नावाने ओळखले जात होते.