मुंबई : धकाधकीचे जीवन, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात रजोनिवृत्ती (मेनोपॉज) हा महत्त्वाचा टप्पा असून, त्याकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नाही. खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांमुळे अनेक महिला डॉक्टरांकडे जाणे टाळतात. मात्र आता राज्यातील शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये हीच सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यभरात एकूण 580 ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत.
रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे उष्णतेच्या लाटा (हॉट फ्लॅशेस), झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता (ऑस्टिओपोरोसिस), वजनवाढ तसेच हृदयविकाराचा धोका वाढण्याच्या समस्या उद्भवू शकतात. या शारीरिक व मानसिक तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ नये आणि महिलांना वेळेवर उपचार मिळावेत, या उद्देशाने आरोग्य विभागाने ‘मेनोपॉज क्लिनिक’ ही संकल्पना राबवली आहे.
दर बुधवारी विशेष ओपीडी
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. दर बुधवारी विशेष ‘मेनोपॉज ओपीडी’ चालवली जाणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन या ठिकाणी दिले जाणार आहे.
जिल्हानिहाय मेनोपॉज क्लिनिक
अकोला - 7
अमरावती - 14
बुलढाणा - 16
वाशिम - 3
यवतमाळ -10
संभाजीनगर- 12
हिंगोली - 7
जालना - 12
परभणी - 11
कोल्हापूर- 14
रत्नागिरी -7
सांगली - 15
सिंधुदुर्ग - 6
बीड -17
धाराशीव - 13
लातूर - 15
नांदेड - 20
भंडारा - 7
चंद्रपूर - 7
गोंदिया - 7
नागपूर - 22
वर्धा - 3
अहिल्यानगर - 26
धुळे - 9
जळगाव- 23
नाशिक - 22
पुणे - 27
सातारा- 19
सोलापूर- 21
पालघर- 7
रायगड - 9
ठाणे -13
महापालिका निहाय क्लिनिक
ठाणे - 7
मुंबई - 25
कल्याण डोबिवली - 4
भिवंडी- 1
मिरा भाईंदर- 1
नवी मुंबई - 5
उल्हासनगर- 4
पनवेल - 1
पुणे - 7
पिंपरी चिंचवड - 8
वसई विरार- 6
नाशिक - 19
मालेगाव - 2
धुळे - 20
अहिल्यानगर - 1
कोल्हापूर - 2
सांगली -3
संभाजीनगर - 7
लातूर- 10
नांदेड - 2
नागपूर - 23
चंद्रपूर -1
“मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या काळात त्यांना शारीरिक व भावनिक आधाराची गरज असते. हे लक्षात घेऊनच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून तज्ज्ञ सल्ला, तपासण्या, समुपदेशन, हाडांचे व मानसिक आरोग्य मार्गदर्शन आणि जीवनशैलीविषयक सल्ला महिलांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे,”प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री