मुंबई : ‘इंडिया मेरिटाईम वीक 2025’मध्ये महाराष्ट्राने तब्बल 56 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील बंदरांचा विकास आणि विस्तार, नवीन शिपयार्डची निर्मिती, जलवाहतूक आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करत जहाजबांधणी अशा विविध क्षेत्रांतील 15 सामंजस्य करारांतून ही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
मुंबईतील नेस्को संकुलात ‘भारतीय सागरी सप्ताह 2025’ या जागतिक प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारच्या बंदरे विभागाने तब्बल 56 हजार कोटींच्या 15 सामंजस्य करारांवर सह्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे आणि विविध जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार करण्यात आले.
या करारांनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रात महाराष्ट्राच्या मेरिटाईम बोर्डाने 15 सामंजस्य करार केले आहेत. यात दिघी आणि जयगड या बंदरांचा विकास आणि विस्तार, नवीन शिपयार्डची निर्मिती, जहाजबांधणी आणि दुरुस्ती, स्वच्छ आणि हरितऊर्जेवरील जहाजबांधणी, जलवाहतूक आदी क्षेत्रांचा समावेश आहे. या करारांमध्ये जगातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. येत्या काळात या करारांच्या आधारे चांगल्याप्रकारे करारांची अंमलबजावणी करून हे उद्योग कार्यान्वित केले जातील. या गुंतवणूक करारांसोबतच मनुष्यबळ तयार करणे, डिजिटायझेशन आदींसाठी भारतातील आयआयटीसह नावाजलेल्या जागतिक संस्थांसोबत धोरणात्मक करारही करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.