मुंबई ः थट्टामस्करीतून झालेल्या वादातून अरुणकुमार युगलकिशोर गुप्ता ऊर्फ पप्पू या 52 वर्षांच्या मित्राची मारहाण करुन हत्या करण्यात आल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहंदी हसन अब्दुल हाजी शेख (39) या आरोपी मित्राविरुद्ध देवनार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या मेहंदीला नंतर पोलिसांनी अटक केली.
ही घटना शुक्रवारी 31 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता गोवंडीतील टाटानगर, दत्त मंदिरासमोर घडली. सुनिलकुमार युगलकिशोर गुप्ता हा कल्याण येथे राहत असून पूर्वी तो टाटानगर परिसरात राहत होता. त्यांचे वडिलोपार्जित घर असून सध्या तिथे त्याचा अविवाहीत भाऊ अरुणकुमार एकटाच राहतो. या रुमच्या वरच्या माळ्यावर दोन रुम असून ते दोन्ही रुम त्यांनी भाड्याने दिले होते. त्यापैकी एका रुमचे भाडे सुनिलकुमार तर दुसऱ्या रुमचे भाडे अरुणकुमार घेत होता.
मेहंदी हसन हा याच परिसरात लहानपणापासून राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी सायंकाळी मेहंदी आणि अरुणकुमार हे दोघेही दत्त मंदिरासमोर होते. यावेळी त्यांच्यात थट्टामस्करी सुरु होती. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता.
या वादातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर रागाच्या भरात मेहंदीने अरुणकुमारला हाताने आणि लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अरुणकुमार हा बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
रात्री सव्वाअकरा वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती समजताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीलकुमार गुप्ता याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मेहंदी हसन शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. थट्टामस्करीतून झालेल्या वादातून आरोपीने त्याच्याच मित्राची हत्या केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.