मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असून शुक्रवारी (23 मे) नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे.
यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई शहरात मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यूू आणि सहव्याधी असलेले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6,819 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण 185 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये 20 बेड आरक्षित ठेवले आहेत.
कस्तुरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 2 बेड आणि 10 बेडचा एक वॉर्ड तयार केला आहे.
बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी 20 बेड आणि 60 सामान्य बेड राखीव ठेवले आहेत.
गरज पडल्यास या रुग्णालयांमधील क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागही सतर्क झाला असून कोरोना रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्था केली आहे. वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.