मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. पवित्र पोर्टलवर एकूण ३०,२०९ रिक्त पदांसाठी उमेदवारांना गुरुवारपासून पदनिहाय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम भरून तो लॉक करणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
शासनाच्या धोरणानुसार संबंधित शाळा व्यवस्थापनांमधील रिक्त पदे, आरक्षणाची स्थिती आणि इतर निकषांचा विचार करून ८० टक्के पदांची भरती या प्रक्रियेत केली जाणार आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातींची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विविध व्यवस्थापनांकडून ३०,२०९ रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मुलाखतीसह असलेली सर्वाधिक पदे खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. शिक्षण विभागाने उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रक्रियेबाबत उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येत आहे.
पसंतीक्रम निश्चित करण्याची मुदत संपल्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पुढील नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, पदभरती प्रक्रियेसंदर्भात काही सूचना, अडचणी किंवा मागण्या असल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर कळवाव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
इयत्तानिहाय रिक्त पदांचा विचार केला असता इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सर्वाधिक १४ हजार ३२० पदे उपलब्ध आहेत. त्याखालोखाल सहावी ते आठवीसाठी १० हजार १२, नववी ते दहावीसाठी ५ हजार ५१३ आणि अकरावी-बारावीसाठी ३६४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक भरतीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
२७ मे ते ५ जून २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धती घेतली टीईटी परीक्षा
२ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती या परीक्षेसाठी
२ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित राहिले
१ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली
१३,३५२ जागा जिल्हा परिषदांच्या
१,९५४ जागा महानगरपालिकांच्या
२८० जागा नगर परिषदांमधील
२,४२१ जागा आदिवासी विकास विभाग
५६ जागा शासकीय विद्यानिकेतनमधील
१२,१४८ जागा खासगी शैक्षणिक संस्थांमधील
१९,८८१ पदे
मुलाखतीशिवाय भरणार
१०,३२८ पदे
मुलाखतीसह भरली जाणार