नवी मुंबई: अंमली पदार्थांविरोधात नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. रविवारी नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकाच वेळी 16 ठिकाणी धाडी टाकून 25 आफ्रिकी नागरिकांना ताब्यात घेतले.
त्यात 14 पुरुष, 7 महिला आणि 4 बालकांचा समावेश आहे. या आफ्रिकी नागरिकांकडून महामुंबई प्रदेश परिसरात ड्रग्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत त्यांच्यापैकी अनेकांकडे वैध पासपोर्ट, व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळले.
नवी मुंबई पोलिसांनी याआधी खारघर, उलवे, वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ सीवूड्स, करावे गावात संयुक्त कारवाई करत अंमली पदार्थांविरोधात जोरदार कारवाई केली होती. खारघरमधील कारवार्ईत कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
याच पद्धतीने ठाणे पोलीस आयुक्तालयातील मानपाडा आणि कल्याण विभागात रविवारी कारवाई करण्यात आली. तर, गेल्याच आठवड्यात नवी मुंबईत दोन, तर कल्याण विभागात एका ठिकाणी सुमारे 40 कोटी रुपयांचे कोकेन, हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
कल्याण विभागात दोन दिवसांपूर्वी 38 कोटींचे हेरॉईन जप्त केले. तर मंगळवारी अपरात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विक्री-वितरणप्रकरणी त्यांचा सहभाग आढळून आला असून त्यांच्याकडून 1 कोटी 27 लाख 61 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
नवी मुंबईतील वाशी येथील जुहुगाव येथे राहत असलेले नायजेरीयन नागरिक हे अमली पदार्थ खरेदी-विक्री-वितरण करतात, तसेच अमली पदार्थांचा साठा राहत असलेल्या घरामध्ये करतात, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने वेगवेगळी पोलीस पथके तयार करून 4 ठिकाणी कोम्बींग ऑपरेशन केले. यात नायजेरीयन नागरीक ऑलिवर ओकेचुक्यु उगवु याच्याकडे 1 कोटी 26 लाख 25 हजार रूपये किंमतीचा 252.5 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ व 12 मोबाईल मिळून आले. ऑलिवरसह मादुयाबुकी कॉसमॉस, इग्वेओमा ईनोसंट, दादा लाविआन्स यांना अटक करण्यात आली आहे.
वॉन्टेड आरोपीही ताब्यात
नवी मुंबई आणि डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नवी मुंबई पोलिसांना हवा असलेला एक प्रमुख आरोपीही या कारवाईत त्यांच्या ताब्यात आला. त्यामुळे या कारवाईनंतर ड्रग्सचे मोठे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.