मुंबई : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील समाधिस्थळाच्या विकासासाठी पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 532.51 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, के.ई.एम. रुग्णालयाची वढू बुद्रुक येथील गट नं. 447 आणि 448 मधील एकूण 0.87 हेक्टर 20 आर जमीन तत्काळ हस्तांतरित केली जाणार आहे. या बदल्यात, शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट नं. 655 मधील 0.81 आर जमीन ‘भोगवटादार वर्ग-2’ म्हणून कब्जा हक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून, तीन वर्षांच्या आत तिथे काम सुरू करावे लागेल.
वढू बुद्रुक येथील नियोजित विकासकामे
* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे अत्याधुनिक संग्रहालय.
* ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध ग्रंथालय.
* 82 आसन क्षमतेचे एक अत्याधुनिक सभागृह. त्यामध्ये 10-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी * महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रफीत दाखवली जाईल.
* स्मारकाच्या परिसरात ‘अद़ृश्य शिल्प’.
* भीमा नदीच्या काठी 120 मीटर लांबीचा घाट.