Maharashtra Assembly Monsoon Session 2025
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकला, मात्र या बहिष्काराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला. विरोधकांनी दिलेल्या भल्यामोठ्या पत्रात तब्बल २४ व्याकरणाच्या चुका काढत, ‘बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकल्यावर असंच होतं,’ असा थेट टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला. त्याचवेळी, ‘झोपलेल्याला उठवता येतं, पण सोंग घेतलेल्याला नाही,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या एकूण भूमिकेवरच जोरदार निशाणा साधला.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी सुरुवातीलाच विरोधकांच्या बहिष्कारावर टीका केली.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले होते, पण त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकला. त्यासाठी त्यांनी एक भलंमोठं पत्र दिले आहे. हे पत्र मोठे असले तरी त्यातील मजकूर अत्यंत तोकडा आहे. विशेष म्हणजे, जे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून गळे काढत आहेत, त्यांच्याच या पत्रात व्याकरणाच्या तब्बल २४ चुका आहेत. अनेकांना सह्याही व्यवस्थित केलेल्या नाहीत. आता बॉम्बे स्कॉटिशसारख्या शाळेत शिकल्यावर मराठीचं असंच होणार,’ असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता काढला.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधक करत असलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात आम्ही मराठी भाषा अनिवार्य केली आहे आणि हिंदीला केवळ पर्यायी भाषेचा दर्जा दिला आहे. असे असतानाही विरोधक चुकीची माहिती पसरवली जात आहे. विशेष म्हणजे, २०२० साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबाबत एक समिती गठीत केली होती. त्यामुळे आता त्यांनीच यावर बोलणे म्हणजे सोंग घेण्यासारखे आहे. आम्ही झोपलेल्याला जागे करू शकतो, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना जागे करू शकत नाही,’ असा टोला लगावला.
अखेरीस, या विषयावर पडदा टाकत सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. ‘त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात निर्माण झालेला गोंधळ पाहता, आम्ही याबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करत आहोत,’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ‘आता यावर सविस्तर अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन समिती स्थापन केली जाईल. त्या समितीच्या अहवालानंतरच राज्यात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, ‘एक भाषा देशाला एकत्र ठेवू शकते, तर दोन भाषा विभागू शकतात. आपण मातृभाषा शिकलीच पाहिजे, पण सोबत हिंदी सुद्धा शिकली पाहिजे, असे बाबासाहेबांनी सांगितले होते,’ याची आठवण करून दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवरही वैयक्तिक टीका केली.
वडेट्टीवारांना टोला :
‘विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार स्थगितीबाबत बोलत होते. त्यांना अजूनही राज्यात उबाठा सरकारच आहे असे वाटत असावे,’ असा टोला त्यांनी लगावला.
आव्हाडांनी दिली कबुली :
‘जितेंद्र आव्हाड यांनी बोफोर्ससारखा घोटाळा चालल्याचा आरोप केला. यातून त्यांनी एकप्रकारे बोफोर्स घोटाळा झाला होता, हेच कबूल केले आहे,’ असे म्हणत त्यांनी आव्हाडांना कोंडीत पकडले.
सही करण्यावरूनही चिमटे :
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या पत्रावरील सह्यांवरूनही टिप्पणी केली. ‘आजच्या पत्रावर भास्कर जाधव यांची सही नव्हती. उबाठा गटाचे ५, काँग्रेसचे ३ आणि शरद पवार गटाच्या केवळ २ नेत्यांच्याच सह्या होत्या,’ असे सांगत त्यांनी विरोधकांमधील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले.
राजकीय टीकेसोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचीही माहिती दिली. ‘राज्यभरात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे आणि खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, विरोधकांमध्ये कल्पकता आणि लोकाभिमुखतेचा अभाव असल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सरकार सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असल्याचे सांगितले.