मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकर्यांना 2 हजार 215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 1 हजार 829 कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.
येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकर्यांच्या बँक खात्यांत ही मदत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकार युद्धपातळीवर कार्यरत आहे. घरे, शेती आणि जनावरांचे नुकसान झालेल्या ठिकाणी गरजेनुसार निकषांत शिथिलता आणून मदत केली जाईल. शेतकर्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक साहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे मदतीचे जीआर काढण्यात येत आहेत. मदत कार्य कुठेही थांबलेले नाही.
केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. तथापि, राज्य सरकारने तातडीने मदत देणे सुरू केले आहे. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे. सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री अद्याप मराठवाड्यात गेले नसल्याची टीका केली. त्यावर, त्यांच्या काळात काय झाले हे लक्षात घेतले, तर ठाकरेंचे आरोप हास्यास्पद वाटतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.