NCP Political Crisis pudhari photo
मुंबई

NCP News : राष्ट्रवादीचे बावीस आमदार फुटणार?

शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, फुटीची चर्चा या वावड्या ः अजित पवार राष्ट्रवादी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 22 आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या 22 आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) अंतर्गत संघर्ष नवे वळण घेण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी पक्षफुटीची चर्चा या वावड्या असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा कोणताही उल्लेख न केल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

विशेषतः, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर या पक्षातील काही नेते आगामी निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. मात्र, आता पक्षातील 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेषत:, पक्षफुटीची बातमी सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी पेरली असल्याचा दावा पार्थ पवार गोटातून केला जात आहे. तर, राष्ट्रवादीविरोधात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे संभ्रम निर्माण करीत असल्याची चर्चाही अजित पवार गटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

आमच्या पक्षात पगारी सूत्र : उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आमदारफुटीची चर्चा साफ फेटाळून लावली. अशी चर्चा घडवून आणण्यासाठी आमच्या पक्षात कोणी पगारी माणसे ठेवले आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आमच्या पक्षातून चुकीची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी-शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये जातील : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार आमच्या पक्षात येणार असल्याची चर्चा काही खरी नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भाजपच्या संपर्कात असून, त्यांचे आमदार भाजपमध्येच जातील, आमच्याकडे येणार नाहीत. एवढेच नाही, तर शिंदे गटातील 18 आमदारही भाजपमध्ये जातील. हे सर्व काही आधीच ठरले आहे; पण ते 2029 च्या निवडणुकीपूर्वी घडेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या रोहित पवार यांनी केला.

सत्ता सोडून कोण जाईल?

आमचा पक्ष सत्तेत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार आपले प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा उपयोग करून घेतात. असे असताना कोणी सत्ता सोडून विरोधी पक्षाकडे कशाला जाईल? असे उमेश पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT