मृणालिनी नानिवडेकर/ प्रसन्न जोशी
मुंबई : मुंबई महानगरात यावेळी महायुतीचाच महापौर होईल, असे आत्मविश्वासाने सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्येही भाजपचा महापौर होत होता. मात्र, उद्धवजी अस्वस्थ झाले आहेत, त्यामुळे यावेळी सोडून द्या, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केल्याने माझ्या सहकारी नेत्यांशी चर्चा करून आम्ही त्यांच्या इच्छेचा मान राखला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते ‘पुढारी’शी बोलत होते. ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी आणि मल्टिमीडियाच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर यांना त्यांनी ही मुलाखत दिली.
त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे 82 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे 84. मात्र, भाजपचा महापौर व्हावा, यासाठी नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आमची संख्या 121 झाली होती. महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद काहीही देण्यास उद्धवजी तयार नव्हते. ते कमालीचे नाराज आहेत, एका खोलीत बसून आहेत, त्यामुळे यावेळी काही मागू नका, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली. ते आमचे सहकारी होते. त्यावेळी नगरसेवकांचा पाठिंबा होता. आम्ही महापौर बसवू शकत होतो, तरीही एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन मी आणि माझ्या सहकार्यांनी महापालिकेत कोणतेही सत्तापद न घेता उद्धवजींचा आदर केला. आमचे 84 सदस्य निवडून आले असते, तरी उद्धवजींनी महापौरपद आम्हाला मिळू दिले नसते, असे सांगत आता यावेळी मात्र भाजप-शिवसेनेचा महापौर मुंबईत येईल, तसेच तो राज्यातल्या कोल्हापूरसह सर्व प्रमुख शहरांमध्ये सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी आपले शब्द वापरत उद्धव यांना मी करप्ट म्हणालो, तर राज यांना कन्फ्युज्ड असे सांगून टाकले, त्याबद्दल त्यांचे आभार असे म्हणत आज मुंबईसाठी वय झाले तरी काहीही करू न शकलेले मी मुंबईचा नाही म्हणताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मले आहेत गुजरातमध्ये. निवडून येतात उत्तर प्रदेशातून आणि दिशा देतात भारताला, याकडे लक्ष वेधत त्यांनी माझीही जन्मभूमी नागपूर असली तरी कर्मभूमी मुंबई असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी घरी चहा पिण्यास बोलावले तर नक्की जाईन. ‘मातोश्री’चे दरवाजे मात्र माझ्यासाठी त्यांनी 2019 मध्येच बंद केले आहेत आणि सुदैवाने दरवाजा उघडा, अशी थाप देण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही, असाही उल्लेख त्यांनी केला. परस्परांच्या विरोधात उभे राहणे म्हणजे शत्रुत्व पत्करणे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. सत्तमध्ये शरद पवार यांना समाविष्ट करण्याची सध्या भारतीय जनता पक्षाची कोणतीही योजना नाही. मात्र, भविष्यात काय घडू शकते ते राजकारणात बोलणे कठीण असते. कोणतीही परिस्थिती ही तात्कालिक असते, असे मी 2019 च्या घडामोडींनंतर शिकलो, असेही त्यांनी नमूद केले.
2017 सालचा मुंबईच्या महापौरपदाबद्दलचा घटनाक्रम सांगताना त्यांनी आज प्रथमच काही घडामोडी समोर आणल्या. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले आहे, असे कारण देत यावेळी महापौरपदावरचा दावा सोडून द्या, अशी विनंती केली आणि आम्ही शिवसेनेशी असलेले संबंध लक्षात घेता ती मान्य केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुढारी’ वृत्त समूहाशी बोलताना केला आहे.
महाराष्ट्रातील महानगरांना ग्रोथ इंजिन करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी, भारत महासत्ता व्हावा यासाठी, शहरांनी आपले योगदान द्यावे हे महापौरांचे मुख्य काम असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.