पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने नेमबाज खेळात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा ७२ वर्षांचा दुष्काळ त्यानं संपवला, त्यांच्या या यशाचा गौरव महाराष्ट्र शासनाकडून देखील करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून ऑलिंम्पिकवीर स्वप्निल कुसाळेला आज (दि.१४) २ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवरून पोस्ट करत दिली. अजित पवार यांनी म्हटले आहे की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक जिंकलं. यानिमित्तानं अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीनं २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.