मुंबई : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथे अनधिकृत वाढीव बांधकामांवर तोडक कारवाई केली. एचडीआयएलने मूळ आराखड्यामध्ये बदल करीत इमारतीत वाढीव बांधकामे केली आहेत. सोमवारी यातील 160 बांधकामांवर हातोडा मारला.
वांद्रे पूर्व येथील मोतीलाल नेहरू नगरात इमारत क्र. 11 एचडीआयएल कंपनीने बांधकाम केले आहे. यात मूळ आराखड्यामध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली यावर धडक कारवाई करण्यात आली. ही इमारत दहा मजल्यांची असून यात आतापर्यंत 8 मजल्यांवरील सुमारे 160 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अनधिकृत बांधकामावर मंगळवारीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली. या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.