मुंबई : कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. राज्याच्या ३३ जिल्ह्यांतील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आतापर्यंत ३७,५२८ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत ९७ टक्के कृषी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. दुष्काळात १४१.५३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १५,३८६.१९ कोटींचा प्रस्ताव राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
‘अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाची मोठी तूट आहे. कोरड्या दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले. राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू करण्यात आले आहेत. या तालुक्यांमध्ये एकूण ३७ हजार ४९६ गावांचा समावेश आहे. एक कोटी ६७ लाख ५६ हजार २७६ खातेदार शेतकऱ्यांपैकी एक कोटी ६१ लाख ९२ हजार ५९५ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
ट्रिगर-१ लागू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये एकूण सुमारे एक कोटी ६६ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व शेती करण्यात आली आहे. यापैकी सुमारे एक कोटी ६१ लाख ३१ हजार ३६२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पिकांच्या नुकसानीची खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी संबंधित विभागांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
नागपूर विभागात पंचनाम्याची संथगती
कृषी विभागाच्या कोकण, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर विभागात १०० टक्के पंचनामे पूर्ण झाले. पुणे ९४ टक्के, लातूर ९७ टक्के, अमरावती ९९ टक्के, तर सर्वात कमी नागपूर विभागात ८६ टक्के पंचनामे झाले आहेत.
३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात नुकसान
३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले एकूण क्षेत्र १४१.५३ लाख हेक्टर आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे एकूण १५ हजार ३८६.१९ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला. जिरायतीचे १०६.५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सध्याच्या दरानुसार हेक्टरी आठ हजार ५०० रुपयांची मदत देण्यासाठी नऊ हजार ०५६.३७ कोटी, बागायतीच्या २८.०५ लाख हेक्टर बाधितच्या प्रति हेक्टर १७ हजार मदतीसाठी चार हजार ७६८.६२ कोटी आणि बहुवार्षिक ६.९४ लाख हेक्टर बाधित क्षेत्राच्या प्रति हेक्टर २२ हजार मदतीसाठी एक हजार ५६१.२० कोटींचा निधी लागणार आहे.
मदत देण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री
राज्य सरकार दुष्काळी परिस्थिती गांभीर्याने घेत असून, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंचनाम्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.