HIV Pudhari
मुंबई

HIV patients Mumbai : मुंबईतील 15027 एचआयव्ही बाधितांनी सोडले अर्धवट उपचार

6 वर्षांत देशभरातील एआरटी केंद्रांतून 2.12 लाख रुग्ण बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी अत्यावश्यक अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांमधून मोठ्या संख्येने रुग्णांनी उपचार अर्धवट सोडल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत देशभरातील एआरटी केंद्रांमधून 2,12,000 हून अधिक एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये मुंबईतील 15,027 रूग्ण तर महाराष्ट्रातील 26,999 रूग्ण आहेत. उपचार अर्धवट सोडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

उपचार नियमित न घेतल्याने रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच औषधांना प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढत असतो. एआरटी उपचार सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच अनेक रुग्ण फॉलोअपसाठी येत नाहीत. पण एआरटी औषधे नियमित आणि आयुष्यभर घेणे अत्यावश्यक असते. उपचार मध्येच थांबविल्यास विषाणू अधिक बळकट होतो आणि पुढील उपचार अधिक गुंतागुंतीचे ठरतात. यामुळे रुग्णाच्या आयुर्मानावर परिणाम होण्यासोबतच समाजात संसर्ग पसरण्याचा धोका देखील वाढतो.

माहिती अधिकार कायद्याअंतर्गत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या सहा वर्षांत देशभरातील एआरटी केंद्रांमधून 2,12,000 हून अधिक एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचार सोडून दिले आहेत. महाराष्ट्रात, 2024-25 या वर्षात 25,750 एचआयव्ही रुग्णांनी उपचार सोडले, तर सप्टेंबर 2025-26 पर्यंत ही संख्या 15,430 पर्यंत पोहोचली. मुंबईमध्येही परिस्थिती वेगळी नाही.

2021-22 मध्ये, 8,925 रुग्णांनी सक्रिय काळजी केंद्रांमधून फॉलो-अप सोडले, 22-23 मध्ये 9 रुग्णांनी, 23 -24 मध्ये 180, 24 -25 मध्ये 342 तर 25 - 26 सप्टेंबरपयत 3871 रूग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत.2024-25 आर्थिक वर्षात, देशभरातील विविध राज्यांमधून 46,529 रुग्णांनी उपचार सोडले, तर सप्टेंबर 2025-26 पर्यंत 44,340 रुग्णांनी उपचार सोडले.

शोधमोहीम गरजेची

आरोग्य विभागाकडून उपचार सोडलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा उपचारांच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहिम राबविणे गरजेचे आहे. समुपदेशन वाढवणे, औषधांची उपलब्धता सुलभ करणे आणि रुग्णांमधील भीती व गैरसमज दूर करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT