मुंबई

राज्यात वर्षात अपघातात 15 हजार जणांचा मृत्यू

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  गेल्यावर्षी राज्यात 15 हजार 224 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 हजार 200 जणांचा खून झाला आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाण सातपटीने असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे वाहतूक अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितले.

सिंघल हे मिरजेत पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात हे नियम न पाळल्याने होत आहेत. वाहन चालविताना हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. सांगली जिल्ह्यात 22 अपघात ब्लॅक स्पॉट आहेत. ते कसे कमी करता येतील, याबाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाताबाबत स्थानिक प्रशासन व अधिकारी यांच्याशी चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील. जिल्ह्यातील फॅन्सी नंबर प्लेट, प्रेस, पोलिस लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. जिल्ह्यात तीन दिवस त्यांचा तपासणी दौरा असून विविध पोलिस ठाण्यांना ते भेटी देणार आहेत. यावेळी राष्ट्रीय महामार्ग पोलिस अधीक्षक लता फड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलिस अपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीव झाडे, नारायण देशमुख, सुधीर भालेवर, सहायक निरीक्षक भगवान पालवे उपस्थित होते.

रोड हिप्नॉसिसने मृत्यूचे प्रमाण अधिक

महामार्गावर अतिवेगासह रोड हिप्नॉसिसनमुळे झालेल्या अपघाताची संख्यादेखील अधिक आहे. रोड हिन्पॉसिसमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूक अप्पर पोलिस महासंचालक डॉ. सिंघल यांनी सांगितले. महामार्गावर रोड हिप्नॉसिसमुळे अपघात कसे होतात, त्याची कारणे कोणती, याबाबत दै. पुढारीने विशेष वृत्तदेखील प्रकाशित केले होते.

SCROLL FOR NEXT