मुंबई; वृत्तसंस्था : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईत एका सोने तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला असून, सुमारे 15 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करून मुख्य सूत्रधारासह 11 जणांना अटक केली आहे.
डीआरआयच्या मुंबई विभागीय युनिटला मुंबईत सोने तस्करी आणि वितळवण्याचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, डीआरआयच्या पथकांनी सोमवारी शहरात चार ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले, ज्यात दोन बेकायदेशीर वितळवणारे युनिटस् आणि दोन अनोंदणीकृत दुकानांचा समावेश होता. या शोध मोहिमेत, सोने वितळवून त्याचे मेण आणि बारसारख्या इतर स्वरूपात रूपांतर केले जाणारे पूर्णपणे कार्यरत युनिट आढळून आले, अशी माहिती एका अधिकार्याने दिली.
या वितळवण्याच्या युनिटस्मधून 6.35 किलो सोने जप्त करण्यात आले आणि तेथे भट्ट्या चालवणार्या लोकांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधाराशी संबंधित दोन दुकानांवर केलेल्या पुढील तपासणीत 5.53 किलो सोन्याचे बार हस्तगत करण्यात आले. एकूण, डीआरआयने 11.88 किलो सोने जप्त केले, त्याची किंमत 15.05 कोटी रुपये आहे. तसेच, 8.72 किलो चांदी देखील जप्त केली, त्याची किंमत 13.17 लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या 11 जणांमध्ये मुख्य सूत्रधार, त्याचा वडील, एक व्यवस्थापक, भाड्याने घेतलेले चार वितळवणारे, एक लेखापाल आणि तीन डिलिव्हरी करणार्या व्यक्तींचा समावेश आहे, असे अधिकार्याने सांगितले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.