मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बँकेच्या सेवक सभेमध्ये बँक सेवकांना 14 टक्के सानुग्रह अनुदानाची भेट देण्यात आल्याची माहिती दिली.
कोणत्याही संस्थेच्या यशात तेथील कर्मचार्यांचा खूप मोठा वाटा असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारून राज्य बँकेच्या प्रशासनाने नेहमीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून सेवकांची दिवाळी दरवर्षी अधिकाधिक गोड करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बोनसचा लाभ बँकेच्या सुमारे 750 कर्मचार्यांना झाला असून, ही रक्कम नऊ कोटी रुपयांइतकी असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक बांधिलकी व नैतिकतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणार्या कर्मचार्यांनाही 10 हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली आहे. बोनसची रक्कम बँकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सेवकांच्या खात्यात जमा झाल्याने सेवकवर्गात आनंदाचे वातावरण आहे.