मुंबई : गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेस आलेल्या 13 कोटी 83 लाख रुपयांच्या चरसचा साठ्याची तस्करी केल्याप्रकरणी मुन्ना नूर अन्सारी याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
21 फेब्रुवारीला पहाटे सव्वाचार वाजता गोरखपूर येथून वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात गोरखपूर-मुंबई ही गाडी फलाट क्रमांक चारवर आली होती. यावेळी एका सफाई कर्मचाऱ्याला जनरल डब्ब्यात एक संशयित बॅग दिसली. रेल्वे पोलिसांसह रेल्वे पोलीस फोर्स, फ्रॉरेन्सिक टिम आणि श्वान पथकाने बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात 31 पॅकेट सापडले.
या पॅकेटमध्ये उच्च प्रतीचे चरस होते. या चरसचे वजन 13 किलो 834 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये इतकी होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना बुधवारी या पथकाने मुन्ना अन्सारीला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच ते चरस पाठविल्याचे तपासात उघडकीस आले.