मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (दि.२) १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव पदावरून बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी बदली झालेले ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांची आता सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती झाली आहे. आठवडाभरातील त्यांची ही दुसरी बदली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सुहास दिवसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण केवळ अकरा महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. तर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी मंत्रालयात बदली झाली आहे. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांची पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव पदी, महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची बदली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांची नियुक्ती उद्योग ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी तर एच. एस. सोनावणे यांची नियुक्ती पुणे येथील क्रीडा व युवक सेवा या विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती सातारा जिल्हाधिकारी पदी करण्यात आले आहे. मुंबईतील रुसाचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव (१), उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची बदली कृषी व पदुम विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचे नियुक्ती महसूल व वनविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मंत्रालयात झाली आहे.