मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी आता प्रवेशासाठी शेवटची फेरी राबवली जाणार आहे. उद्या 13 सप्टेंबरपर्यत संबंधित फेरी राबविण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही साडेआठ लाखांच्या जवळपास जागा रिक्तच राहिल्या आहेत.
मुंबई विभागातून 4 लाख 73 हजार 780 जागा आहेत. या जागांवर आतापर्यंत 3 लाख 12 हजार 620 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, 1 लाख 61 हजार 160 जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांमध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक 62 हजार 451 जागा रिक्त राहिल्या आहेत.
त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यातून 49 हजार 740 जागा, पालघर जिल्ह्यातून 29 हजार 579 आणि रायगड जिल्ह्यातून 19 हजार 390 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक 77 हजार 153 जागा रिक्त राहिल्या आहेत. वाणिज्य शाखेसाठी असलेल्या 2 लाख 33 हजार 770 जागांपैकी 1 लाख 56 हजार 617 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या तब्बल 77 हजार 153 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेच्या 1 लाख 65 हजार 855 जागांपैकी 1 लाख 17 हजार 952 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने 47 हजार 903 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर कला शाखेच्या 74 हजार 155 जागांपैकी 38 हजार 41 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने 36 हजार 114 जागा रिक्त राहिल्या आहेत.
या विशेष फेरीअंतर्गत भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे तसेच किमान दहा पसंतीक्रम भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी विशेष फेरीसाठी प्रवेशप्रक्रियेचे निकाल जाहीर केले जातील. अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक असून त्यासाठी आणि 13 सप्टेंबर या दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 544 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 22 हजार 298 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 45 हजार 244 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 67 हजार 542 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 83 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 56 हजार 582 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 68 हजार 64 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 24 हजार 646 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 65 हजार 716 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 77 हजार 180 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 42 हजार 896 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतिम फेरीचे वेळापत्रक
12 सप्टेंबर : भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे तसेच किमान 10 पसंतीक्रम भरणे
12 सप्टेंबर : प्रवेश जाहीर करणे
12 आणि 13 सप्टेंबर : विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत