Mumbai Metro : ११ वर्षांत १११ कोटी मेट्रो प्रवासी  File Photo
मुंबई

Mumbai Metro : ११ वर्षांत १११ कोटी मेट्रो प्रवासी

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोला मोठा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

111 crore metro passengers in 11 years

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतली पहिलीवहिली मेट्रो 8 जून 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. त्याला रविवारी 11 वर्षे पूर्णे झाली आहेत. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर गेल्या 11 वर्षांत 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. सर्वाधिक गर्दीच्या अंधेरी रेल्वे स्थानकाला थेट जोडत असल्याने इतर कोणत्याही मेट्रोपेक्षा या मेट्रोला मुंबईकरांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर 12 स्थानके आहेत. यापैकी घाटकोपर मेट्रो स्थानकातून सर्वाधिक 30 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. अंधेरी स्थानकातून 23 कोटी आणि साकीनाका स्थानकातून 11 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. सोमवारी ते शुक्रवार या काळात दैनंदिन प्रवासी संख्या साधारण 5 लाख असते. 5 लाख 47 हजार ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे.

मेट्रो 1 ही डीएननगर येथे मेट्रो 2 अ मार्गिकेला तर पश्चिम द्रुतगती मार्ग येथे मेट्रो 7 मार्गिकेला जोडते. भुयारी मेट्रोचे मरोळ नाका स्थानकही मेट्रो 1 स्थानकाच्या जवळ आहे. त्यामुळे मुंबईच्या इतर भागांत पोहोचणेही शक्य होते.

मेट्रो 1 ला 40 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यात भारत सरकारचा ‘शहरी दळणवळणातील सर्वोत्तम प्रवासी सेवा पुरस्कार’ आणि ‘वाहतुकीतील नवनिर्मितीसाठी इन्फ्रा पुरस्कार’ यांचा समावेश आहे.

मेट्रो 1मुळे दरवर्षी 67 हजार टन कार्बन उत्सर्जनाची भरपाई होते. ही गोष्टी 30 लाख झाडे लावण्यासारखी आहे. मेट्रोच्या संचालनात सौरऊर्जेचाही वापर केला जातो.

12 लाख 60 हजार फेर्‍या

मेट्रो 1 हा सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे उभारण्यात आलेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे. गेल्या 11 वर्षांत मेट्रो 1च्या 12 लाख 60 हजार फेर्‍या झाल्या आहेत. यात मेट्रोने 1 कोटी 45 लाख कोटी किमी अंतर पार केले. मेट्रो 1चा वक्तशीरपणा 99.99 टक्के तर उपलब्धता 99.96 टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT