मुंबई: रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानासोबत 26 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) ‘108 अॅम्ब्युलन्स’ प्रकल्प सुरू केला. गेल्या 11 वर्षांत राज्यातील सुमारे 1 कोटी 9 लाख 4 हजार 55 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. मुंबईतील 10 लाखांहून अधिक लोकांना या सेवेचा फायदा झाला.
2014 ते 2025 या काळात 108 अॅम्ब्युलन्समध्ये 41,033 बाळांचा जन्म झाला. फक्त 2018 या एका वर्षातच 11,141 बालकांचा जन्म अॅम्ब्युलन्समध्ये झाला. तसेच 17,39,221 गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविण्यात आले.
या सेवेच्या माध्यमातून अपघातातील 5,36,856 जखमींना, मारहाणीत जखमी 91,114 जणांना, भाजलेल्या 30,836 रुग्णांना आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या 91,570 रुग्णांना मदत मिळाली. उंचावरून पडलेल्या 1,59,459 व्यक्तींना तसेच नशा किंवा विषबाधा झालेल्या 2,52,298 लोकांना या सेवेचा लाभ झाला. याशिवाय 67 लाख 3 हजार 920 रुग्णांना वैद्यकीय साहाय्य मिळाले. त्यात 4,218 रुग्णांना अॅम्बुलन्समध्येच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, तर 156 जणांना डिफिब्रिलेशन करण्यात आले.
सध्या 937 अॅम्ब्युलन्स कार्यरत असून ती वाढवून 1,756 केली जाणार आहेत. त्यात 255 अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स, 1,274 बेसिक लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स, 36 निओनेटल अॅम्ब्युलन्स, 166 फर्स्ट रिस्पॉन्डर बाईक, 10 सी-बोट अॅम्ब्युलन्स आणि 15 रिव्हर-बोट अॅम्ब्युलन्सचा समावेश असेल.
अॅम्ब्युलन्समध्ये ‘5-जी’
नव्या अॅम्बुलन्समध्ये 25 हून अधिक अत्याधुनिक उपकरणे असतील. यात व्हेंटिलेटर, डिजिटल ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम, आधुनिक स्ट्रेचर, ईसीजी व कार्डियक मॉनिटरिंग, डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीम यांचा समावेश असेल. पुढील टप्प्यात या प्रकल्पांतर्गत वैद्यकीय ड्रोन व हेलिकॉप्टरद्वारे आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.